याअगोदर १ कोटीची तर यंदा 25 लाखांची वीजचोरी उघडकी!
News published by News24tas
जालना : बिलाच्या थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केलेला असताना देखील व्यवसायासाठी पुन्हा 25 लाख रुपयांची वीजचोरी करणाऱ्या जालन्याच्या भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भागवत किसनराव बावणे याच्यावर महावितरणाने पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे बावणेवर गतवर्षीही दीड कोटी रुपयांची वीजचोरी केल्याचा गुन्हा दाखल आहे. तरी देखील आरोपी बावणेस पोलिसांकडून अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
जालना तालुक्यातील राजूर रोडवरील गुंडेवाडी शिवारात गट क्र.49 मध्ये आरोपी बावणेची राजवर्धन ॲग्रो या नावाने व्यावसायिक जोडणी आहे. वीजबिल थकल्याने महावितरणने 26 जून 2021 रोजी या ठिकाणचा पुरवठा कायमस्वरूपी खंडित केला होता. महावितरणने गतवर्षी कायमस्वरूपी पुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांच्या पडताळणीची मोहीम राबवली. या मोहिमेत महावितरणच्या जालना शहर-1 विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत सोनार यांच्या पथकाने 25 एप्रिल 2024 रोजी या ग्राहकाची तपासणी केली असता तो लघुदाब वाहिनीवर सर्व्हिस वायर टाकून व्यवसायासाठी चोरी करताना आढळून आला. आरोपी बावणेने 1 कोटी 49 लाख 3 हजार 556 रुपयांची 3 लाख 86 हजार 417 युनिट चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे कार्यकारी अभियंता सोनार यांच्या फिर्यादीवरून आरोपी बावणेवर सदर बाजार पोलिस ठाण्यात भारतीय विद्युत कायद्याच्या कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आधी १ कोटींची व आता २५ लाखांची वीजचोरी उघडकीस.
मागीलवर्षी प्रमाणे यावर्षीही पुन्हा महावितरण कायमस्वरूपी पुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांच्या पडताळणी मोहीम राबवत आहे. बावणे हा याआधीच वीजचोरी करताना पकडला गेलेला असल्याने त्याची पुन्हा एकदा पडताळणी करण्याचा निर्णय महावितरणच्या पथकाने घेतला.
महावितरणच्या मान देऊळगाव शाखेचे कनिष्ठ अभियंता विशाल हिवरडे यांच्या पथकाने 7 फेब्रुवारी 2025 रोजी जालना-राजूर रोडवरील गुंडेवाडी शिवारात राजवर्धन ॲग्रो या ग्राहकाची तपासणी केली. या ठिकाणी आरोपी भागवत किसनराव बावणे हा महावितरणच्या लघुदाब वाहिनीवर सर्व्हिस वायर टाकून आपल्या व्यवसायासाठी चोरी करताना आढळून आला. आरोपी बावणेने 25 लाख 52 हजार 380 रुपयांची 57930 युनिट चोरी केल्याचे तपासात स्पष्ट झाले. बावणे ज्या रोहित्रावरून चोरी करत होता ते रोहित्र बंद करण्यात आले. कनिष्ठ अभियंता विशाल हिवरडे यांच्या फिर्यादीवरून भारतीय विद्युत कायद्याच्या कलम 135 अन्वये आरोपी भागवत किसनराव बावणे याच्यावर सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छावा बघून दिल्लीतले तरुण जागी झाले पण महाराष्ट्रातले मावळे का नाही?
जालना :- महानगर पालिकेला होणार तब्बल ४० कोटी चा फायदा -आ.खोतकर
