मनसेतर्फे शिवाजीपार्कात सर्वांत मोठ्या प्रदर्शनाचे आयोजन!

राज ठाकरेंनी पोस्ट करत दिली प्रदर्शनाची माहिती.

News published by News24tas

मुंबई:- येत्या २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिना निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शिवाजी पार्क मैदानावर भव्य पुस्तकाचे प्रदर्शन भरवण्यात येणार असून याबाबतची माहिती राज ठाकरे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे व मराठी साहित्य दर्शनाचे हे सर्वात मोठे पुस्तक प्रदर्शन असेल असे राज ठाकरे म्हणाले. त्याचबरोबर सर्वांनी कुटुंबासोबत उपस्थित रहावे असे आव्हान करत मराठी भाषा ही आपली ओळख व शक्ती आहे असे देखील राज ठाकरे म्हणाले.

प्रदर्शन

राज ठाकरे यांनी प्रदर्शना विषयी नेमके काय म्हणले?

सस्नेह जय महाराष्ट्र,

येत्या २७ फेब्रुवारी २०२५ ला, मराठी भाषा गौरव दिनाचं औचित्य साधत मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, एक भव्य पुस्तक प्रदर्शन भरवत आहे. हे पुस्तक प्रदर्शन चार दिवस म्हणजे २ मार्च २०२५ पर्यंत असेल. महाराष्ट्रातील सर्व नामांकित प्रकाशक या प्रदर्शनात त्यांची पुस्तकं घेऊन येत आहेत. मराठी साहित्याचं दर्शन घडवणारं हे सगळ्यात मोठं पुस्तक प्रदर्शन असेल याची मला खात्री आहे.

या कार्यक्रमाचे  औपचारिक उदघाट्न झाल्यावर काही मान्यवरांना बोलावून त्यांच्या आवडीची एक कविता त्यांनी म्हणावी असा विचार डोक्यात आला, आणि जवळपास १७ मान्यवरांशी मी बोललो आणि प्रत्येकाने आनंदाने या कल्पनेला होकार दिला. इतक्या मान्यवरांच्या मुखातून मराठी कविता ऐकणे हा एक अनुभव असेल तो प्रत्यक्ष अनुभवायला याच.

पण, या कार्यक्रमाला तुमच्या कुटुंबाला घेऊन नक्की या. आपली मराठी भाषा ही आपली ओळख आहे आणि आपली शक्ती पण.

या भाषेत किती अफाट साहित्य आणि त्यातून विचार निर्माण झाला आहे हे पुढच्या पिढयांना कळायलाच हवं. आणि हे का करावं लागेल तर आजकाल दोन मराठी माणसं सुद्धा सर्रास एकमेकांशी हिंदी किंवा इंग्रजीत बोलतात. असं का होतंय हे कळत नाही…मराठी उत्तम साहित्याची भाषा होतीच आणि ती परंपरा सुरु आहे ,पण मराठी ही आता ज्ञानची भाषा देखील व्हायला लागली आहे. जगभरातील अनेक उत्तमोत्तम पुस्तकं मराठीत येत आहेत, ज्यातून बदलत्या जगाचं भान येणं सहज शक्य आहे. हे आत्ताच पुढच्या पिढ्यांच्या मनात रुजवावं लागेल. आणि हे जर घडलं तर अजून ताकदीने लेखक, विचारवंत या भूमीत निर्माण होतील.

मराठी माणसात वैश्विक दृष्टिकोन निर्माण व्हावा अशी आमची मनापासून इच्छा आहे, पण त्यासाठीची खिडकी ही मराठीची असावी. आणि म्हणूनच हे पुस्तक आयोजित करत आहोत. जरूर या प्रदर्शनाला भेट द्या.

वाट बघतोय…

राज ठाकरे ।

 

मराठी बातम्या, मराठी न्यूज, महाराष्ट्र,मराठी जॉब, सरकारी भरती, मेगा भरती, goverment jobs, साठी जॉईन करा आमचे telegram चॅनल .

news24tas
Author: news24tas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित बातम्या