जालना जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालायचा अजब प्रकार रुग्ण हैराण
जालना :- जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालायचा अजब कारभार चालू असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला असून तत्काळ यावर कारवाई करण्यात यावी असे निवेदनाद्वारे म्हणले आहे. जालना येथील गांधी चमन भागात असलेल्या जिल्हा रुग्णालयात तेथील डॉक्टर व काही कर्मचाऱ्यांचा अजब प्रकार चालू असून तेथे उपचारासाठी आलेल्या रुग्णाला सरकारी दवाखण्यात उपचार न देता खाजगी दवाखान्यात उपचारासाठी पाठवण्यात येते असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला व यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी अशी विनंती करून कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा मनसे पदअधिकाऱ्यानी दिला. यावेळी जिल्हा रुग्णालयात निवेदन देतेवेळी मनवीसे शहर अध्यक्ष महेश नागवे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनात नेमके काय म्हणले
जालना जिल्हा स्त्री रुग्णालय, गांधी चमन जालना येथे गेल्या कित्येक वर्षापासून सावळा गोंधळ आणि रुग्णांच्या जिवाशी खेळणे सुरु आहे. जिल्हा प्रशासनाने व महाराष्ट्र शासनाने कोट्यावधीचा पैसा खर्च करुन सदरील रुग्णालय स्त्रीयांसाठी सुरु केले आहे. मात्र या ठिकाणी गरोदर महिला प्रसुतीसाठी आल्यानंतर अथवा इतर कोणत्याही उपचारासाठी या रुग्णालयात दाखल झाले असता त्यांना याच रुग्णालयातील कर्मचारी सर्रासपणे खाजगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देत असतात. गोरगरीब रुग्ण हे अधीच आर्थिक अडचणीमुळे शासकिय रुग्णालयात येणे पसंत करतात व आपला हक्क मिळण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र येथे आल्यावर त्यांचे समस्येचे निदान होण्याआधीच त्यांना याच रुग्णालयातील कर्मचारी, डॉक्टर, नर्स हे सर्रासपणे खाजगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देत असतात. जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये सर्व सोयीसुविधा, डॉक्टर, औषधी, उपचार सामग्री उपलब्ध असतांना देखील कामचुकार कर्मचारी, डॉक्टर व नर्स हे रुग्णांना मुद्दामहून छळतात, त्यांच्याकडुन पैशाची मागणी करत असतात, जेमतेम उपचार करुन रुग्णांना खाजगी रुग्णालयात पाठवण्याचा प्रयत्न करतात. वेळोवेळ रुग्णांकडे लक्ष देत नाही. रुग्णांच्या नातेवाईकांना पैशाची मागणी करत असतात. रुग्णांच्या नातेवाईकांवर राग व्यक्त करुन त्यांच्यासोबत असभ्यपणे वागणुक करत असतात. विशेषतः जिल्हा स्त्री रुग्णालयात सेवा बजावणाऱ्या बहुतांश डॉक्टारांचे बाहेर सुध्दा खाजगी क्लिनीक, दवाखाना आणि हॉस्पिटलसुध्दा आहे. त्यामुळे सरकारी पगारा बरोबरच त्यांनी त्यांच्या पेशाचे सर्रास व्यवसायिकीकरण करुन सरकारी रुग्णालयात येणाऱ्या गोरगरीब रुग्णांची पिळवणुक सुरु केलेली आहे. या सर्व बाबींकडे व घडणाऱ्या प्रकाराकडे रुग्णालया प्रशासन, स्थानिक प्रशासन अजिबात लक्ष देत नाही. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना कुणीही वाली शिल्लक नाही. करीता या निवेदनाद्वारे विनंती करण्यात येते की, या प्रकरणाची प्रशासनाकडे त्वरीत दखल घेण्यात यावी आणि यापुढे जर असा प्रकार निदर्शनास आला तर मनसे तर्फे मोठ्या प्रमाणात निदर्शने व अंदोलन करुन मनसे स्टाईने प्रकरणात लक्ष घालण्यात येईल व गोरगरीब रुग्णांना न्याय देण्यात येईल.
#mnsjalna