श्रद्धेच्या भावनेने देवाच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांना सोई सुविधा मिळणार की नाही?
News published by News24tas
पंढरपूर:– भक्तांचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पंढरपूर तीर्थक्षेत्रात लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत असून ऐन कडक उन्हाळ्यात भक्तांची मोठी गैरसोय होत आहे व याकडे प्रशासनासह मंदिर समितीचे देखील दुर्लक्ष असल्याचे निदर्शनास येत आहे. मंदिर परिसरात भक्तांच्या सोईसाठी १९८७ साली बांधण्यात आलेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज दर्शन मंडप येथे देखील मोठ्या प्रमाणात अस्वच्छता होत असून उन्हाळ्यात येणाऱ्या भाविकांना येथे मोठ्या प्रमाणात गरमीचा सामना करावा लागत आहे. प्रशासनानं इथे लक्ष देऊन आहे त्या फॅन च्या संख्येत वाढ करण्याची गरज असल्याचे मत अनेक भाविकांनी आमच्या प्रतिनिधी कडे व्यक्त केले.
देवाच्या दर्शनासाठी भक्तांची अग्नि परीक्षा !
विठ्ठल मंदिरात विठुरायाच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून व इतर राज्यातून देखील अनेक भाविक दररोज येत असतात. विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी जो दर्शन मंडपाकडे जाणारा मार्ग आहे तो लोखंडी पूल असून उन्हाळ्यात त्याचे तापमान इतके वाढते की त्यावरून चालणाऱ्या भाविकांना अक्षरशः अग्नी परीक्षा दिल्या सारखे वाटतं. इतक्या उन्हात तापलेल्या त्या लोखंडी पत्रावरून चालणे खूपच अवघड झाले असून प्रशासनाने यावर लक्ष देऊन तत्काळ तेथे पुष्टे अथवा इतर कोणत्या कापडाची सुविधा करावी जेणे करून येणाऱ्या भाविकांना गैरसोय होणार नाही अशी मागणी अनेक भाविक व्यक्त करत आहेत.
