आज ४ फेब्रुवारी आजच्याच दिवशी १६७० ला ‘गड आला पण सिंह गेला’
News published by News24tas
तानाजी मालुसरे हे मराठा साम्राज्याचे एक अत्यंत महत्त्वाचे आणि साहसी नायक होते. त्यांचे जीवन आणि कार्य आजही आपल्या इतिहासात उजळून दिसते. शौर्य, कर्तव्य, निष्ठा आणि स्वधर्मासाठी त्यांच्या दिलेल्या योगदानामुळे त्यांना एक अमिट स्थान मिळाले आहे. त्यांच्या जीवनाची गाथा समजून घेतल्यावर प्रत्येक मराठी माणसाला गर्व आणि प्रेरणा मिळते.
तानाजींचे जीवन शौर्य, बलिदान आणि निष्ठेचे प्रतीक होते. सिंहगडच्या युद्धात शहीद झाल्यानंतर, त्यांचे बलिदान मराठा साम्राज्याच्या इतिहासात अमर झाले. त्यांचे बलिदान आणि शौर्य शिवाजी महाराजांच्या साम्राज्य स्थापनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे होते. त्यांची शहादत सर्व मराठ्यांना प्रोत्साहन देणारी ठरली व आजही आपल्या सर्वांसाठी ती प्रेरणा दायक तर आहेच त्याचबरोबर महाराजांच्या मावळ्यांचा लढवय्या इतिहास सांगणारी त्याची साक्ष देणारी देखील आहे.
४ फेब्रुवारी १६७० ‘गड आला पण सिंह गेला’
४, फेब्रुवारी… १६७० रोजी या दिवशी कोंढाणा अर्थात सिंहगडावर पराक्रमाचा, त्यागाचा आणि निष्ठेचा असा अतुलनीय इतिहास लिहिला गेला. वर्ष १६६५. जून महिना. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांसोबत केलेल्या तहात कोंढाणा किल्ला द्यावा लागला. मात्र १६७० साली कोंढाणा पुन्हा स्वराज्यात आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. यावेळी कोंढाण्याच्या मोहिमेवर जाण्यासाठी एक नाव पुढं आलं. ते नाव होतं, तानाजी मालुसरे…
दिनांक ४ फेब्रुवारी १६७०, अष्टमीच्या काळोख्या रात्री अवघ्या शे पाचशे मावळ्यासंह तानाजी मालुसरे कोंढाण्याच्या पायथ्याशी पोहोचले. अत्यंत अक्रारविक्राळ आणि उंच असलेला कडा चढून तानाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी दीड हजारांच्या संख्येत असणाऱ्या मुघल सैन्यासोबत लढा दिला. या लढाईत तानाजी आणि उदयभान आमने सामने आले आणि त्यांच्यात झुंज झाली. यात तानाजींना आपला एक हात ही गमवावा लागला. मात्र तरीही न डगमगता अखेरच्या श्वासापर्यंत या सिंहानं हातावर तलवारीचे वार झेलीत उदयभानला कडवी टक्कर दिली. अखेर या लढाईत तानाजी मालुसरे धारातिर्थी पडले. पण तोपर्यंत सुर्याजी आणि शेलारमामा यांनी मोघल सैन्याचा पाडाव करून कोंढाणा ताब्यत घेतला. मात्र लाडक्या तान्याची खबर ऐकताचच महाराज हळहळले आणि त्यांच्या तोंडून उद्गार निघाले, गड आला पण सिंह गेला…..
अशा महाराज्यांच्या लढाऊ वीर तानाजी मालुसरे यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त न्युज२४ तासचा मानाचा मुजरा.
