प्रत्येकाने वर्षातून एकदातरी शिवचरित्राचे पारायण केले पाहिजे.- ठाकरे 

शिवाजी महाराजांची जयंती 365 दिवस साजरी झाली पाहिजे – राज ठाकरे.

News published by News24tas

मुंबई:– आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती (तिथीप्रमाणे) असून सर्व महाराष्ट्रात शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी होत आहे. महाराजांच्या जयंतीच्या शुभेच्छा देत राज ठाकरेंनी देखील महाराष्ट्रातील जनतेला आव्हान केले आहे की, आज काल छोट्या छोट्या पिछेहाटीने किंवा नकाराने नैराश्य येण्याच्या काळात,प्रत्येकाने वर्षातून एकदा तरी महाराजांच्या चरित्राचे पारायण केले पाहिजे.

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत काय म्हणाले राज ठाकरे?


आज महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती. दरवर्षी महाराजांची जयंती तिथीनुसार आणि तारखेनुसार साजरी होते. यावर मध्येमध्ये वाद पण होत असतात. खरंतर महाराजांची जयंती ही ३६५ दिवस साजरी व्हायला हवी इतके महाराज लोकोत्तर पुरुष होते. पण ३६५ दिवस साजरी करायची म्हणजे शिवचरित्रातून ३६५ दिवस काही ना काही बोध घेऊन रोजच्या आयुष्यात मार्गक्रमण केलं पाहिजे.

वयाच्या पंधराव्या वर्षी स्वराज्याचं स्वप्न पहायचं, त्याची ध्येयधोरण आखायची आणि स्वतःच आर्थिक चलन आणायचं , फार्सी भाषा नाकारून स्वतःचा मराठी शब्दकोश निर्माण करायचा , पुढे एक एक किल्ले जिंकायचे आणि लहान वयातच पीछेहाट पण सहन करायची आणि हे करताना आपल्या सोबतच्या सहकाऱ्यांचे मनोधैर्य कुठेही खचू द्यायचे नाही याला एक अद्वितीय प्रतिभाच असली पाहिजे.
महाराजांच्या आयुष्यात मधला एक कालखंड असा एक जाणवतो की त्यात फार काही घडत नाही असं वरवर बघणाऱ्याला वाटेल, पण त्याच काळात महाराजांनी खूप पुढची आखणी केली. आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे तसं, जेंव्हा बाहेर वादळ असतं तेंव्हा शांत आत बसून शक्ती साठवून ठेवावी आणि जेंव्हा बाहेर शांतता असते तेंव्हा आपलं वादळ निर्माण करावं. महाराजांच्या आयुष्याकडे बघितलं की नेहमी कुतूहल वाटतं की ही समज इतक्या लहान वयात कुठून आली असेल.

आजकाल छोट्या छोट्या पीछेहाटीने किंवा नकाराने नैराश्य येण्याच्या काळात, प्रत्येकाने वर्षातून एकदा तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचे पारायण केलं तर इतक्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा महाराजांनी किती शांतपणे स्वराज्य उभं केलं हे जाणवेल, आणि मग असली किरकोळ नैराश्य कधीच येणार नाहीत.

माझ्या संपूर्ण आयुष्यावर शिवचरित्राचा प्रभाव आहे, त्यामुळे कधीच नैराश्य, नकारात्मकता मला स्पर्शून पण जात नाही आणि झटपट यशासाठी कुठलाही शॉर्टकट घ्यावासा वाटत नाही. मला जे योग्य वाटतं ते मी विचारांती बोलतो, आणि हे करताना महाराष्ट्र घडवण्याचं माझं जे ध्येय आहे त्यावरची अगाढ श्रद्धा टिकून राहते हे सगळं शिवचरित्राने मला दिल आहे. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवण्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांकडून सदैव मिळत राहू दे हीच इच्छा.

छत्रपती शिवाजी महाराज या अलौकिक नायकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मानाचा मुजरा !अशा प्रकारे राज ठाकरेंनी शिवजयंतीच्या महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा दिल्या.

होळीला गालबोट चक्क परप्रांतीयांकडून पोलिसावरच प्राणघातक हल्ला.

महानगरपालिकेने जाहीर केली दंडाची नियमावली पण सुविधांचे काय?

जालना :- महानगर पालिकेला होणार तब्बल ४० कोटी चा फायदा -आ.खोतकर

जरांगे जी गाडी वापरतात ती देखील वाळू माफियांची-हाके

news24tas
Author: news24tas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित बातम्या